English मराठी

‘महालाभार्थी’ या पोर्टलचा उद्देश

सर्वसामान्य नागरिकांच्या उत्कर्षासाठी शासन विविध योजना राबवित असते. पात्र होऊ शकणाऱ्या योजनांच्या माहितीच्या अभावामुळे जसे की, पात्रतेचे निकष, अर्ज कुठे व कसा करावा इत्यादी माहिती नीट आणि वेळेवर मिळाली नाही तर बरेचदा लाभार्थी त्या योजनांपासून वंचित राहू शकतात. अशा सर्व योजनांच्या माहितीचे अचूक संकलन करून, नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना लागू पडणाऱ्या व्यक्तिअनुरुप स्वरूपातील सर्व योजनांची माहिती क्लिक सरशी उपलब्ध करणे हा ‘महालाभार्थी’ पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.

या योजनांचे वर्गीकरण करून, त्यासाठी लागणाऱ्या नागरिकांच्या विविध माहिती स्त्रोतांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या शासन आदेशांचा (GR) अभ्यास करून हे पोर्टल बनवण्यात आले आहे. याचबरोबर विविध शासकीय विभागांच्या अधिकृत संकेतस्थळांचा (वेबसाईट) सुद्धा यासाठी संदर्भ घेण्यात आला आहे.


महाराष्ट्र शासन हा प्रकल्प का करीत आहे?

ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यासाठी आणि त्यातून समाजविकासासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ‘एमकेसीएल’ संस्थेचे यात महत्वाचे योगदान आहे. या संस्थेच्या मदतीने शासन ‘महालाभार्थी’ हा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पामार्फत विविध योजनांचे लाभार्थी होऊ शकणाऱ्या नागरिकांपर्यंत, शासनाच्या न पोहोचलेल्या योजनांची योग्य माहिती व्यक्तिगतरीत्या पोहोचवण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) केला आहे.


'महालाभार्थी’ कसे काम करते?

नागरिक स्वतः कंप्यूटर किंवा मोबाईलवर अथवा जवळच्या एमकेसीएल MS-CIT केंद्रात जाऊन ‘महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणी करू शकतात. नागरिकांच्या वैयक्तिक माहितीनुसार, व्यवसायानुसार त्यांना योजना व त्यांचे लाभ निवडण्याची सुविधा ‘महालाभार्थी’ पोर्टलवर आहे. पसंतीनुसार निवडलेल्या सर्व लाभांसाठी / योजनांसाठी नागरिकांची संभाव्य पात्रता पडताळून देण्यात येते. नागरिक ज्या ज्या योजनांना पात्र आहेत त्या त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा, कोणाला भेटावे ह्याची माहितीसुद्धा नागरिकांना ‘महालाभार्थी’ सेवेच्या माध्यमातून देण्यात येते.


‘महालाभार्थी’ पोर्टलची सेवा घेताना नागरिकांना करावी लागणारी प्रक्रिया


महाराष्ट्रातील नागरिक स्वत: किंवा संगणक वापरू शकणाऱ्या सुलभकाच्या (Facilitator) मदतीने ‘महालाभार्थी’ या वेबपोर्टलची सेवा घेवू शकतात. 'महालाभार्थी’ सेवांसाठी https://www.mahalabharthi.in ह्या वेब पोर्टलवर नागरिकांनी भेट द्यावी. ‘महालाभार्थी’ ही सुविधा मोबाईल अॅप द्वारे सुद्धा उपलब्ध झालेली आहे. गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर जाऊन MahaLabharthi असा शोध (search) घेतला असता हे अॅप दिसू लागेल. ते अॅप नागरिक आपल्या अँड्रॉईड मोबाईल वर डाउनलोड करून इंस्टॉल करू शकतात.

‘महालाभार्थी’ पोर्टलवर नागरिकांची अचूक माहिती यावी आणि ती भरताना नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाचावा या उद्देशाने ‘नागरिक माहिती अर्ज’ उपलब्ध करून दिलेला आहे. नागरिकांनी प्रथम त्याची pdf प्रत डाऊनलोड करावी. ‘महालाभार्थी’ पोर्टलची सेवा घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी पोर्टलवर नोंदणी करण्यापूर्वी हा माहिती अर्ज पूर्णपणे व्यवस्थित भरून तयार ठेवावा.

कशी असेल नोंदणी प्रक्रिया?

नागरिक दोन पद्धतीने ‘महालाभार्थी’पोर्टलवर नोंदणी करू शकतात.

  1. १) स्वतः कंप्यूटर किंवा मोबाईलवरून महालाभार्थी पोर्टलला भेट देऊन. किंवा
  2. २) सुलभकाच्या (Facilitator) मदतीने. आपल्या परिसरातील सुशिक्षित युवा, संगणक साक्षर असलेले नागरिक, एमकेसीएलची MS-CIT केंद्रे, इत्यादी हे सुलभक म्हणून नागरिकांना सशुल्क मदत करू शकतात.

नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. नागरिकांनी आपला मोबाईल क्रमांक, संपूर्ण नाव, जन्मदिनांक, इ-मेल आयडी (अनिवार्य नाही) ही माहिती भरून नोंदणी करावी. यावेळी त्यांना पडताळणी साठी नमूद केलेल्या मोबाईलवर एक ६ अंकी One Time Password (OTP) येईल. त्याची पडताळणी केल्यानंतर, नवीन पासवर्ड टाकून तसेच नियम आणि अटी मान्य करून नोंदणी पूर्ण होईल. यशस्वीरीत्या नोंदणी झाल्यावर नागरिकांना नोंदणीकृत मोबाईलवर तसा संदेश येईल. त्यामध्ये त्यांचा १२ अंकी लॉगीन आयडी दिलेला असेल. हा लॉगीन आयडी आणि तयार केलेला पासवर्ड पुढील सर्व प्रक्रियेसाठी महत्वाचा आहे त्यामुळे तो सांभाळून ठेवणे अपेक्षित आहे. नागरिकांनी आपला पासवर्ड गोपनीय राहील याची काळजी घ्यावी.

नोंदणी केल्यानंतरची प्रक्रिया

इथे नागरिक स्वत: उर्वरित प्रक्रिया पूर्ण करू शकतात किंवा त्यासाठी सुलभकाची मदत घेवू शकतात. या प्रक्रियेचे खालील प्रमाणे विविध टप्पे असतील.

  1. १. महालाभार्थी पोर्टल वर लॉगीन करणे: ‘महालाभार्थी’ पोर्टलवर ‘नागरिकांचे लॉगीन’ यावर क्लिक करून सर्वप्रथम लॉगीन करावे. यावेळी नोंदणीच्या वेळी मिळालेल्या लॉगीन आयडी आणि पासवर्ड चा वापर करावा. जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर काळजी करू नका तो पुन्हा मिळविण्याची सुविधा सुद्धा तेथे उपलब्ध आहे.
  2. २. स्वत:ची प्राथमिक माहिती भरणे: यशस्वीरीत्या लॉगीन केल्यानंतर मुख्य पानावर उजव्या बाजूला ‘स्वत:ची माहिती भरा’ असे दिसेल. त्यावर क्लिक केल्यास आपल्यासमोर ‘प्राथमिक माहिती’ चे पेज येईल. शासनाच्या बहुतांश योजनांची पात्रता ज्या माहितीवरून ठरते अशी माहिती येथे विचारली आहे. नागरिकांनी ही माहिती काळजीपूर्वक भरावी. येथे नागरिक आपला आधार क्रमांक भरू शकतात जो की ऐच्छिक असेल.
  3. ३. शैक्षणिक माहिती भरणे: त्यानंतर नागरिकांनी स्वत: च्या शिक्षणासंदर्भात माहिती येथे भरायची आहे. नागरिक जर विद्यार्थी असेल तर संपूर्ण शैक्षणिक माहिती भरली जाईल याची काळजी घ्यावी कारण त्यावरूनच बऱ्याच शैक्षणिक योजनांची पात्रता ठरणार आहे.
  4. ४. विविध सरकारी योजनातून अनेक प्रकारचे जे लाभ मिळतात ते चित्ररूप पद्धतीने तसेच लिखित स्वरुपात बघणे: नागरिकांना पोर्टलवर ‘ माझ्या गरजा / मी कोण’ असे दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही पर्याय चित्ररूपात दाखविले जातील, जसे की, घर, अर्थसहाय्य, खते, बियाणे, रोजगार, शेततळे, विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण इत्यादि गरजा दिसतील. किंवा 'भूमिका निवडा' या बटणावर क्लिक करून नागरिक आपण कोण आहोत हे निवडू शकतील जसे की, शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार, इत्यादी. येथे नागरिक एकापेक्षा अधिक पर्याय निवडू शकतात. नागरिकांनी निवडलेल्या गरजा अथवा भूमिकांच्या अनुषंगाने विविध शासकीय योजनांमध्ये मिळणाऱ्या लाभांची माहिती चित्रमय स्वरूपात पोर्टलवर चित्ररुपात दिसेल.
  5. ५. इच्छुक असलेल्या लाभांसाठी पात्रता जाणून घेणे: पोर्टलवर ‘माझे लाभ’ यावर क्लिक केले असता निवडलेल्या भूमिकांनुसार विविध योजना त्यांच्या विभागाप्रमाणे आपल्या समोर येतील. प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला काय लाभ मिळू शकतील हे लिहिलेले आहे. त्याच्या चित्रावर क्लिक केल्यास आपल्याला संबंधित योजनेचा थोडक्यात तपशील मिळेल. येथे आपल्याला योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक विहित नमुन्यातील अर्ज तसेच अधिक माहितीसाठी शासकीय निर्णय डाऊनलोड करण्याचीही सुविधा आहे, विविध विभागांकडून ते जसजसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे येथे वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. ज्या योजनांच्या लाभांसाठी आपण इच्छुक असाल त्या लाभांखाली आपणास टिक (✔) करावी लागेल. ज्यावर आपण अशी (✘) खूण केली असेल त्या लाभांसाठी आपण इच्छुक नाही असे समजले जाईल व त्या लाभांशी निगडीत योजना आपणास पुढील टप्प्यामध्ये दाखवण्यात येणार नाहीत. योजनांचे लाभ शोधण्यासाठी येथे डाव्या बाजूला विशेष सोय आहे, तेथून आपण विभागाप्रमाणे किंवा लाभाच्या प्रकारानुसार योजना पाहू शकता.
  6. ६. इच्छुक लाभांकरिता संभाव्य पात्रता ठरविणे: योजनांसाठीची आपली संभाव्य पात्रता ठरविण्यासाठी पोर्टलवर गरजेनुसार अजून थोडी माहिती भरावी लागते. परंतु जर आपण संपूर्ण माहिती सुरवातीलाच व्यवस्थित भरली असेल तर याची फारशी गरज पडत नाही. त्यानंतर पोर्टल आपणासाठी संभाव्य अशा पात्र योजनांची निवड करेल. आवश्यक तेथे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, ज्याची आपणास होय किंवा नाही मध्ये उत्तरे द्यायची आहेत.
  7. ७. संभाव्य पात्रता सिद्ध झालेल्या योजनांची सर्व माहिती बघणे: सर्व माहिती भरल्यावर व आवश्यक तेथे प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आपणास संभाव्य पात्रता सिद्ध झालेल्या योजना, त्यामध्ये मिळणारे लाभ, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्या योजनांसाठी कुठे संपर्क करायचा इत्यादी माहिती संक्षिप्त स्वरुपात आपणास मिळेल.
  8. ८. मिळालेल्या माहितीची प्रिंट-आउट घेणे: शेवटी नागरिकास संभाव्य पात्रता सिद्ध झालेल्या योजनांच्या व्यक्तिअनुरुप स्वरूपातील माहितीची संक्षिप्त प्रिंट-आउट मिळेल. त्यामध्ये योजनेचे नाव, त्यामध्ये मिळणारे लाभ, ते लाभ मिळविण्यासाठी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे आणि कुणाला भेटावे याचा तपशील असेल. या प्रिंट-आउटचे महत्वाचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांचे नागरिकाच्या नावाचा उल्लेख असलेले एक पत्र दिलेले आहे. नागरिक संभाव्य पात्र असलेल्या योजनांसाठी जेव्हा शासकीय विभागांना अर्ज करतील, तेव्हा ते माननीय मुख्यमंत्री यांचे हे पत्र सोबत जोडू शकतात. याला एक संदर्भ क्रमांक दिलेला असून त्याच्या सहाय्याने आपल्याला संबंधित योजनांचे त्या त्या विभागांकडून लाभ मिळविण्यात काही अडचण आल्यास पाठपुरावा करण्यास मदत होईल.